Monday, November 25, 2019

शिक्षणावरही बोलू काही प्रस्तावना

शिक्षणावरही बोलू काही
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२
९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?

प्रस्तावना
  15 जून 2009 ते 15 सप्टेंबर 2019 या काळात आम्ही प्रथम अमेरिकेत वास्तव्याला होतो. नंतर 2014, 2015 व 2016 या वर्षीही असेच चार/चार महिने माझे अमेरिकेत वास्तव्य होते. पहिल्यांदा आमचा मुक्काम इरी या गावी होता, तर नंतरच्या तीन वर्षात याॅर्क (न्यूयाॅर्क नव्हे) या गावी माझे वास्तव्य होते. ही दोन्ही गावे पेन्सिलव्हॅनिया या प्रगत व संपन्न प्रांतात मोडतात. याॅर्क ही तर अमेरिकेची पहिली राजधानी होती. पण त्यावेळी अमेरिका हे राष्ट्र म्हणून रीतसर जन्माला आले नव्हते, तर याॅर्कला राजधानी कसे म्हणायचे, या वादात आपण पडूया नको. ही दोन्ही गावे तशी लहानशीच म्हणावीत, अशी आहेत. इथून कधी  स्वत:च्या तर कधी भाड्याच्या कारने आम्ही मैलोगणती प्रवास करून वाॅशिंगटन, न्यूयाॅर्क, डेटन, गेटिसबर्ग, कोलंबिया, बाल्टीमोर आणि अशी अनेक शहरे पालथी घातली. कार चालविण्याची जबाबदारी मुलगा चि. अजितने घेतली होती. तर प्रवासातील हवं नको पाहण्याची जबाबदारी, छायाचित्रण सून नीलमने उचलली होती. नातू ओम्कार व नात अनुषा प्रवासात कार्टूनादी बालचित्रे पाहण्यात गर्क असत. आणि कारमधून उतरल्यानंतर माझ्या दोन्ही बाजूने चालत ‘सुरक्षेची’ काळजी घेत असत. अमेरिकेतील शिक्षणपद्धती, सामाजिक जीवन, ताणतणाव, राजकीय डावपेच आदीबाबत माहिती मिळविण्याचा प्रयत्न मी यथाशक्ती केला. या कामी नीलमचे मला विशेष साह्य झाले. तरीही माझी स्थिती हत्ती व सहा आंधळे यातील एका आंधळ्यासारखीच होती. मी जे पाहिले, मला जे दिसले, जे मी जाणून घेतले, समजून घेतले, जे मला समजले, जे मी अनुभवले ते त्रोटक, अपुरे, वास्तवतेपासून दूर असण्याची शक्यता आहे, हे मान्य करूनही वाचकांना वाचावेसे वाटेल, थोडेफार उपयोगी पडेल, असे वाटते.
अमेरिकेची मला जाणवलेली खास वैशिष्ट्ये
अमेरिकेचा भौगोलिक विस्तार भारताच्या तिपटीहून जास्त आहे, लोकसंख्या मात्र आपल्या एकचतुर्थांशपेक्षा कमी आहे.
एक राष्ट्र म्हणून अमेरिकेचे बालपण जेमतेम संपलेले आहे.
अमेरिकेत जर्मन, स्पॅनिश, इटालियन, ज्यू व इंग्लिश असे अनेक प्रकारचे लोक वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक झाले आहेत. त्या त्या देशातील लोकांची वैशिष्ट्ये त्या त्या प्रांतात आजही पहायला मिळतात. जसे जर्मनांची शिस्तप्रीयता, इटालियन लोकांची कलासक्ती, मौजमजा करण्याची वृत्ती वगैरे.
अमेरिकेतील 1862 च्या सुमारास संपलेले गृहयुद्ध हे खरोखरच भावाभावांमधले युद्ध होते. आता केंद्रीय सत्ता असलेले पण राज्यांना भरपूर अधिकार असलेले राष्ट्र, पराकोटीचे व्यक्तिस्वातंत्र्य, गुलामगिरीचा अधिकृत निषेध यासह लोकशाही या देशात नांदते आहे.
अमेरिका हे एक ख्रिश्चन राष्ट्र आहे.पण धर्मग्रंथातील मानवजन्माच्या गोष्टीला च्छेद देऊन उत्क्रांतिवाद मानणाऱ्या आणि मांडणाऱ्या चार्ल्स डार्विनचा उत्क्रांतिवाद इथे दिमाखात वावरतो आहे.
प्रत्येकाला आपापल्या धर्ममतानुसार पूजा, प्रार्थना करण्याचे स्वातंत्र्य आहे.

ते आणि आपण
समाजजीवन, स्त्रीपुरुषसंबंध, पितापुत्रसंबंध, गुरुशिष्य संबंध, उपभोगाचा पुरस्कार
आदीबाबत अमेरिका आणि भारत यात फार मोठे अंतर आहे पण काही मानवसुलभ साम्येही दाखविता येतात. जसे अमेरिकन आईलाही आपल्या मुलीचा घटस्फोट व्हावा, असे वाटत नाही. ती एक नाइलाजाने घडणारी बाबच मानली जाते. शिक्षणक्षेत्रात केजी 2 ते बारावीपर्यंतचे शिक्षण सर्वांना (म्हणजे अगदी सर्वांना) निःशुल्क आहे. केजी1 लाच का वगळले आहे ते कळत नाही. शिक्षणसंस्था या निमित्ताने या वर्षापुरते वारेमाप शुल्क आकारतांना दिसतात. 12 वी नंतर कमवा आणि शिका ही भूमिका आहे. विशेष पात्रता असेल तरच पदवीशिक्षणासाठी प्रवेश मिळतो. इतर व्यवसायाचे, धंद्याचे प्रमाणपत्र/ पदविका शिक्षण घेऊन नोकरी धंद्याला लागतात. परिसर शाळा हा नियम आहे, म्हणजे एका परिसरातील मुलांनी त्याच परिसरातील शाळेत प्रवेश घेण्याचे बंधन आहे. पण याचा अर्थ इथे सर्वच चांगले व नियमाबरहुकुम सुरू आहे, असे नाही. पण जे गैर त्याचा निषेध आहे, त्यावर कायदेशीर इलाज आहे, त्याला कायदेशीर मान्यता नाही. त्यांचे ते सगळेच चांगले आणि आपले ते सर्व वाईट किंवा उलट या दोन्ही भूमिका चुकीच्या आहेत.
   विश्वात जेजे चांगले आणि उत्तम असेल त्याचे आपण भारतीय स्वागत करतो. नव्हे आपल्या पूर्वजांची ही प्रारंभापासूनची भूमिका राहिलेली आहे. त्यामुळे नीरक्षीरन्यायाने चांगले कोणते व हिणकस कोणते, हे समजून घेणे आपल्याला कठीण वाटू नये.
— वसंत गणेश काणे

उ:शापाच्या प्रतीक्षेत शापित स्पेन

उ:शापाच्या प्रतीक्षेत शापित स्पेन
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२
९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?

   10 नोव्हेंबर 2019 ला स्पेनमधील 14 वी निवडणूक पार पडली. तसे स्पेन हा देश आज वृत्तक्षेत्रात फारसा गाजतांना दिसत नाही. पण त्याचे न गाजणे हेच तर एक महत्त्वाचे वृत्त नाहीना असे म्हणण्याची वेळ आली आहे. तसे पाहिले तर एकेकाळी स्पॅनिश आर्माडाचा दरारा ब्रिटिश आरमाडापेक्षा जास्त होता. जगात ठिकठिकाणी त्यांच्या वसाहती होत्या. स्पॅनिश भाषा बोलणाऱ्यांची संख्या जगात फार मोठी आहे. दोन मराठी भाषक मुलं जशी आपापसात मध्येच हिंदीत बोलतात, त्याप्रमाणे अमेरिकेत अनेक ठिकाणी मुले स्पॅनिश भाषा वापरतात, अशी तिची विशेषता आहे. अमेरिकेतील मूळच्या रहिवाशांचा वंशविच्छेद करणाऱ्यात स्पॅनिश लोक आघाडीवर होते, असे म्हटले जाते. तर आमची गाठ ज्या मूळ निवासींशी पडली होती, तेच स्वभावत: क्रूर व ऊग्र वृत्तीचे होते, अशी दुसरी बाजू मांडण्यात आली आहे. दुसऱ्या महायुद्धात स्पेन तटस्थ होता. इंग्लंड व फ्रान्स जर्मनीशी लढले व जिंकले पण तिघेही सारखेच घायाळ झाले होते. युद्धात स्पेन तटस्थ राहून नामानिराळा होता पण तरीही फारशी प्रगती करू शकला नाही. उलट घायाळ व पराभूत झालेला जर्मनी तरारून प्रगती करीत पुढे आलेला दिसतो आहे. स्पेनच्या या स्थितीला कारण स्पॅनिश वृत्ती आहे, असेही एक मत आहे. हे खरे असावे, असे वाटण्याचे एक कारण स्पेनमध्धील निवडणुकांमध्ये तर सापडत नाहीना, असा प्रश्न निर्माण होतो. ही स्पेन मधली गेल्या चार वर्षातली चौथी निवडणूक आहे. कोणत्याही पक्षाला लागोपाठ चौथ्यांदा स्पष्ट बहुमत मिळू शकलेले नाही. पक्षांची बजबजपुरी, विघटनवादी गट आणि अल्पमतवाल्यांना सापत्नभावाची वागणूक यामुळे स्पेनमधील समाजजीवन सतत अशांत असते, असे म्हटले जाते.
 कॅटालोनियाचा सवता सुभा
  कॅटालोनिया मध्ये सतत ऊग्र प्रदर्शने, हिंसाचार व संप होतच असतात.  कॅटालोनिया हा आर्थिकदृष्ट्या संपन्न प्रांत आहे. बार्सिलोना, गिरोना, लेडा आणि तारागोना या चार विभागांचा मिळून तयार होणाऱ्या या कॅटालोनिया प्रांतात १६ टक्के लोकसंख्या असून सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या २० टक्के उत्पन्न कॅटालोनियातून मिळते. स्पेन व पोर्तुगाल मिळून आपल्या भारतासारखे एक द्विपकल्प (तीन बाजूंनी समुद्र व एका बाजूला जमीन) तयार झाले आहे.  जमिनीकडून स्पेन हा देश कॅटालोनिया या सरहद्दीच्या प्रांताने युरोपला जोडलेला आहे. हे भौगोलिक वैशिष्ट्य महत्त्वाचे आहे कारण की, त्यामुळे हा संपन्न भूभाग स्पेनपासून सहज वेगळा होऊ शकेल असा आहे. हा भूभाग स्पेनच्या मध्यभागी असता तर हे शक्य झाले नसते. कुणी सांगावे, वेगळेपणाची भावनाही कॅटालोनियामध्ये निर्माण झाली नसती.
  स्पेनमधील लोकशाही व्यवस्थेचे स्वरूप
   स्पेनच्या संसदेत (मुद्दाम परिचित नावे घेतली आहेत) दोन सभागृहे आहेत.
(1) कॅांग्रेस ॲाफ डेप्युटीजमध्ये 350 तर (2) सिनेटमध्ये 265 सदस्यसंख्या आहे.
स्पेनमध्ये सामान्यत: दर चार वर्षांनी चार पातळींवर निवडणुका होतात.(1) देश, (2) प्रांत व (3) स्थानिक स्तरावर प्रतिनिधी निवडले जातात. तसेच (4) युरोपियन पार्लमेंटवर सुद्धा प्रतिनिधी निवडले जातात. प्रतिनिधी निवडण्याच्या पद्धतीला पार्टी लिस्ट प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन असे नाव आहे. या पद्धतीनुसार पक्ष उमेदवारांची यादी जाहीर करतात. पक्षांना मिळालेल्या मतांच्या टक्केवारीच्या प्रमाणात जागा मिळतात व यादीतील क्रमानुसार तेवढे उमेदवार निवडून आल्याचे जाहीर केले जाते. फक्त सिनेटचे प्रतिनिधी मात्र भारताप्रमाणे ज्याला जास्त मते तो विजयी (50 % किंवा कितीही कमी मते असली तरी) या पद्धतीने निवडले जातात.
   स्पेनमध्ये राष्ट्रीय व प्रादेशिक पातळीवर बहुपक्षीय लोकशाही आहे. सध्या पाच/सहा पक्षच प्रभावी स्वरुपात असून राष्ट्र व प्रादेशिक पातळीवर डझनावारी राजकीय पक्ष असून काहींना तर राष्ट्र व/वा प्रादेशिक पातळीवर निवडणूक जिंकून आजवर कधीही प्रतिनिधित्व मिळालेले नाही.
1. पीपल्स पार्टी (पीपी) - हा उजवीकडे झुकलेला, सनातनी, कॅथोलिक धर्ममत मानणारा व आर्थिक उदारतावादी व युरोपियन एकतावादी पक्ष आहे. याला  21.00 % मते व 89 जागा म्हणजे पूर्वीपेक्षा  (+23) जागा जास्त मिळाल्या आहेत.
2. स्पॅनिश सोशॅलिस्ट वर्कर्स पार्टी (पीएसओई) - हा डावीकडे झुकलेला, लोकशाहीवादी, कामगार चळवळीशी जवळीक साधून असलेला, संघराज्यवादी, युरोपियन एकतावादी पक्ष आहे. याला  28.00 % मते व 120 जागा म्हणजे पूर्वीपेक्षा  (–3)जागा कमी मिळाल्या आहेत.
3. युनायटेड वी कॅन - हा डावीकडे झुकलेला, लोकशाही समाजवादी, संघराज्यवादी, सैनिकीकरण विरोधी, कामगार चळवळीशी जवळीक साधून असलेला, स्त्रीपुरुष समानता आणि आंतरराष्ट्रीयवादाचा  पुरस्कर्ता व पर्यावरणवादी पक्ष आहे.  याला  13 %मते व 35 जागा म्हणजे पूर्वीपेक्षा  (–7) जागा कमी मिळाल्या आहेत.
4. सिटिझन्स पार्टी - उजवीकडे झुकलेला, आर्थिक उदारमतवादी, विकेंद्रीकरणवादी पण स्वायत्तताविरोधी व युरोपियन एकतावादी पक्ष आहे.    याला 7 %मते व 10 जागा म्हणजे पूर्वीपेक्षा  (–47) जागा कमी मिळाल्या आहेत व या पक्षाचे पानिपत झाले आहे.
5. व्हॅाक्स पार्टी - अतिउजवा, ऊग्र स्पॅनिश राष्ट्रवादाचा पुरस्कर्ता, सनातनी, आर्थिक उदारतावादी, इस्लामी स्थलांतरितांना आसरा देण्यास विरोध असलेला व त्यांना इस्लामिक देशांनीच आसरा द्यावा, असे मानणारा, पण ख्रिश्चनांना मात्र आश्रय देण्याच्या बाजूचा असलेला पक्ष आहे. याला  15 % मते व 52 जागा म्हणजे पूर्वीपेक्षा  (+28) जागा जास्त मिळाल्या आहेत व या पक्षाचे भाग्य फळफळले आहे.
6. रिपब्लिकन लेफ्ट ॲांफ कॅटालोनिया - कॅटालोनिया येस (ईआरसी - कॅटसी) पार्टी -आत्यंतिक डावा पण राष्ट्रवादी, कॅटलन स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता, लोकशाही व संघराज्यवादी असा पक्ष आहे. याला 4% मते व 13 जागा म्हणजे पूर्वीपेक्षा  (–2) जागा कमी मिळाल्या आहेत
7. टुगेदर फॅार कॅटालोनिया पार्टी - हा उजवा, कॅटलन स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता,  उदारमतवादी पक्ष आहे.  याला  2 % मते व 8 जागा म्हणजे पूर्वीपेक्षा  (+1) जागा जास्त मिळाली आहे.  
8. एकता, प्रगती आणि लोकशाहीवादी पार्टी - हा प्रागतिक, सामाजिक उदारमतवादवादी, उजव्या व डाव्यात समतोल साधणारा व स्पेनच्या अखंडतेचा खंदा पुरस्करता असलेला व  प्रादेशिक राष्ट्रवादाचा विरोधक असलेला पक्ष आहे. याला  1.2 % मते व फक्त 1 जागा तीही यावेळी मिळाली आहे.
9.  प्राणीक्रूरता विरोधी पार्टी (पीएसीएमए)- हा प्राण्यांच्या हक्कांचा पुरस्कार करणारा, प्राणीमित्र, पर्यावरणवादी व सामामाजिक न्यायाचा पुरस्कार करणारा पक्ष आहे. याचा बुल फाईट्सना विरोध आहे. याला  1 % मते व 0 जागा म्हणजे पूर्वीइतक्याच 0 जागा मिळाल्या आहेत. प्राण्यांचा कैवारी असलेल्या पक्षाची ही स्थिती पाहून मन विषण्ण होते.
  तसेच पक्षांची उद्दिष्टे, त्यांना मिळालेली मतांची टक्केवारी आणि मिळालेल्या जागांचा तपशील बोलका व स्पेनच्या अंतरंगावर प्रकाश टाकणारा आहे.
  या सर्वांची बेरीज होते 328 उरलेल्या 22 जागा इतर लहानमोठ्या पक्षात विखुरलेल्या स्वरुपात वाटल्या गेल्या असून बजबजपुरीत भर टाकणाऱ्या आहेत.
  पक्षांपेक्षा आवळ्यांची मोट बांधणे सोपे!
  विद्यमान पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांच्या सोशालिस्ट पक्षाने सर्वाधिक 120 (पण पूर्वीपेक्षा - 3 कमी) जागा जिंकल्या असल्या, तरी 350 जागांच्या कॅांग्रेस ॲाफ डेप्युटीजमध्ये (विधिमंडळामध्ये) बहुमत सिद्ध करण्यासाठी या जागा खूपच अपुऱ्या आहेत. एप्रिल महिन्यात झालेल्या मागील निवडणुकांमध्येही बहुमत सिद्ध करण्यात अपयश आल्यामुळे सांचेझ यांनी देशात पुन्हा निवडणुका घेण्याचे जाहीर केले होते. त्यांनी पुन्हा प्रगतीशील सरकार स्थापन करण्याचे आश्वासन देशाला दिले आहे. तथापि, त्यांचा सहकारी पक्ष असलेल्या 'युनायटेड वी कॅन' या टोकाच्या डाव्या पक्षाला 35 (पूर्वीपेक्षा -7 कमी) जागा मिळाल्या असल्याने या दोन्ही पक्षांनाही सरकार स्थापनेसाठी अन्य पक्षांची मदत लागणार आहे. त्याचप्रमाणे, (पीपल्स) पार्टीला  89 (पूर्वीपेक्षा    +23 जास्त)  जागा मिळून तो दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला असून 'वोक्स पार्टी' या उजव्या पक्षाला 52 (पूर्वीपेक्षा +28 जास्त) मिळाल्या आहेत. सिटिझन्स पार्टीला 10 (पूर्वीपेक्षा - 47 कमी) जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे यातले समविचारी व उरलेले अन्य पक्ष यांची मोट बांधण्याची जबाबदारी मावळते पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांच्यावर येऊन पडली आहे.
    पक्षोपपक्षांची भाऊगर्दी, एकराष्ट्रीयत्वापासून फुटिरतावाद्यांपर्यंत टोकाचे मतभेद असलेले  व निरनिराळ्या  रंगढंगात रममाण होणारे पक्षोपपक्ष हा स्पेनच्या वाट्याला आलेला शापच आहे, असे म्हणावे लागेल. शौर्य, संपन्नता, व्युत्पन्नता, पूर्वदिव्य ह्या सर्व बाबी अनुकूल असूनही एकराष्ट्रीयत्वाची भावना नसेल तर या सर्वांची कशी माती होते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून स्पेनकडे बोट दाखविता येईल. शाप देणाऱ्यानेच उ:शापही द्यायचा असतो, नाही का? मग स्पेनच्या बाबतीतच हे का घडले नसेल?  या उ:शापाच्या शोधात स्पेन चाचपडतो आहे, हे मात्र खरे